खामगाव - शहरातील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार असलेल्या तलाठी राजेश चोपडे याने गुरूवारी दुपारी शहर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्याच्या विरोधात शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुरूवारी दुपारी शहर पोलिसांनी चोपडेला अटक केली.
खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. दरम्यान, त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर महसूलच्या काही महत्वपूर्व दस्तवेजाची खाडाखोड आणि पाने फाडल्याचे कृत्य चोपडेने केले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विकाससिंह राजपूत यांनी सुरूवातीला तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या तसेच आणखी एका तक्रारीच्या अनुषंगाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी तलाठी चोपडे रा. खामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महसूल प्रशासनाच्यावतीने ७ जानेवारी २०२० रोजी तलाठी राजेश चोपडे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी प्राधीकृत अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सूर्यकांत सातपुते यांची तक्रारीसाठी नेमणूक केली होती. २८ एप्रिल २०१९, १८ नोव्हेंबर २०१९ आणि ७ जानेवारी २०२० अशा वेगवेगळ्या फसवणुकीच्या तीन तक्रारी तलाठी चोपडे विरोधात दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.चोपडेशी संबंधितांची चौकशीप्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार चोपडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस चोपडे फरार असल्याने चोपडेशी संबंधित तपास एपीआय रविंद्र लांडे यांच्याकडून पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडे सहा दिवसांपूर्वीच वळता करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरिक्षक अंबुलकर यांनी चोपडेशी संबंधित अनेकांची चौकशी सुरू केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चोपडेचे विविध बँक खातेही गोठविण्यात आले होते. त्याचा पासपोर्टही लॉक करण्यात आला होता.चोपडेच्या शोधार्थ एक पथक पुण्याततलाठी चोपडे याच्या पुणे येथील वास्तव्याचा पोलिसांकडून सातत्याने शोध घेण्यात येत होता. पाच दिवसांपूर्वीच सहा जणांचे एक पथक पुणे येथे दाखल झाले होते. पीएसआय सोळंके यांच्या नेतृत्वात हे पथक पुण्यात होते.
फरार तलाठी राजेश चोपडे याला गुरूवारी ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. त्याच्या शोधासाठी एक पथक पाच दिवसांपूर्वीच पुणे येथेही पाठविण्यात आले होते. - सुनिल अंबुलकर, पोलीस निरिक्षक, शहर पोलीस ठाणे, खामगाव.