पलूस : खरेदी केलेल्या जमिनीची सात-बारा सदरी नोंद करण्यासाठी ३२ हजारांची लाच घेताना पलूस येथील तलाठी बाबूराव बाळासो जाधव (वय ३९, रा. बुर्ली) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याबाबत पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सात-बारा सदरी नोंद घेऊन उतारा देण्याकरिता पलूस येथील तलाठी बाबुराव जाधव याने ४० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी बाबुराव जाधव याने लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. तडजोडीअंती ३२ हजार रुपयांचा व्यवहार ठरला. त्यानंतर सोमवारी तहसील कार्यालय येथे सापळा लावला असता बाबुराव जाधव याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ३२ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
जाधव याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, अपर उपआयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे यांनी केली आहे.