लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकू मारून महिलांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. तीन जणांच्या या टोळीतील आरोपी राहुल मल्लेश आरमुुल्ला (वय २३) याला पोलिसांनी अटक केली असून, मुरली परशुरामन (वय २८) तसेच राकेश सुब्रमण्यम सानपती (वय २९) हे दोघे फरार आहेत.उपरोक्त तीनही आरोपी वेल्लोर, चेन्नई (तामिळनाडू) येथील रहिवासी आहेत. त्यांनी नागपूर तसेच चंद्रपूर येथे भाड्याच्या खोल्या घेऊन लूटमार केल्याचे उघड झाले आहे.भल्या सकाळी अंगणात साफसफाई करणाऱ्या, रांगोळी घालणाऱ्या महिलांना पाहून आरोपी त्यांच्या जवळ जायचे. चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करायचे. विरोध केल्यास चाकू मारून त्यांना जखमी करायचे आणि दागिने हिसकावून पळून जायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती आहे. हे गुन्हे करण्यासाठी ते चोरीच्या दुचाकीचा वापर करायचे. २३, २४ आणि २५ जानेवारीच्या सकाळी त्यांनी अशाप्रकारे वेगवेगळ्या भागात महिलांना जखमी करून त्यांचे दागिने लुटले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला घटनास्थळ परिसरातील एक मोबाईल वापरणारा आरोपी तामिळनाडूत असल्याचा धागा मिळाला. त्यावरून पोलिसांचे एक पथक वेल्लोर, चेन्नई येथे गेले. तेथून मोबाईलधारक आरोपी चंद्रपूरच्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी चंद्रपूरला जाऊन प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे आरोपी राहुल मल्लेश आरमुल्ला याला अटक केली. त्याने तीनही गुन्ह्यांची कबुली दिली. सोबतच साथीदार मुरली आणि राकेशचेही नाव सांगितले.लाखोंचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी आरोपी राहुलकडून लुटलेले दागिने, गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटरसायकल, मोबाईल आणि दागिने असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय किरण चौगुले, दिलीप चंदन, पीएसआय पुरुषोत्तम, रमेश उमाठे, बट्टूलाल पांडे, नागोराव इंगोले, हवलदार कृपाशंकर शुक्ला, अजयसिंग बघेल, अजय रोडे, देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर, राजेंद्र तिवारी, दीपक झाडे, शिपाई नितीन आकोते, आशीष क्षीरसागर, सचिन तुमसरे, बबन राऊत, प्रशांत कोड़ापे, अविनाश ठाकुर, सुहास शिंगणे आणि आशीष पाटील यांनी ही कामगिरी बजावली.