तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील हस्तमपट्टी येथील न्यायालयात एक गंभीर घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एक कार्यालयीन सहाय्यक न्यायाधीशांच्या केबिनमध्ये घुसला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. वारंवार होण्याऱ्या बदल्यांमुळे संबंधित व्यक्ती संतापला होता.
"सकाळी 10.30 च्या सुमारास न्यायदंडाधिकारी-IV एम. पोपंडी यांच्यावर हल्ला झाला. ते कोर्टात त्यांच्या चेंबरमध्ये होते. त्यानंतर प्रकाश नावाचा कर्मचारी त्यांच्या केबिनमध्ये घुसला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे तो त्रस्त होता. मंगळवारी पुन्हा त्याच्या बदलीचे आदेश आले होते. याचबाबत न्यायाधीशांना जाब विचारण्यासाठी तो त्यांच्या केबिनमध्ये गेला होता", अशी माहिती हस्तमपट्टीचे निरीक्षक पी.प्रकाश यांनी दिली.
दोघांमधील चर्चेचं रुपांतर वादात झालं आणि प्रकाशने धारदार शस्त्र बाहेर काढले. न्यायाधीशांवर त्यानं अनेकवेळा वार केले. न्यायाधीशांनी बचावासाठी आरडाओरडा केल्यावर न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी त्यांच्या चेंबरकडे धावले. त्यांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली. हल्ल्यात जखमी झालेल्या न्यायाधीशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्या खांद्याला आणि छातीला दुखापत झाली आहे.
पोलीस निरीक्षक पी प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला हस्तमपट्टी पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात येत आहे. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम-३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत प्रकाशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.