तिरुचिरापल्ली: पत्नीच्या अबोल्यामुळे संतापलेल्या पतीनं मद्यपान करुन कार, बाईक आणि इमारतीला आग लावली. तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपी पती 30 वर्षांचा असून तो बऱ्याच कालावधीपासून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेरोजगार पती नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत नसल्यानं पत्नीनं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्यामुळे पती संतापला होता.तिरुचिरापल्लीमध्ये राहणारा 30 वर्षांचा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. त्यानं एखादी नोकरी शोधावी, यासाठी पत्नीनं त्याच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे पती वैतागला होता. पती नोकरी करत नसल्यानं पत्नीनं गेल्या काही दिवसांपासून अबोला धरला होता. यामुळे नाराज झालेल्या पतीनं दारु पिऊन घराजवळील एका कारसह काही बाईक पेटवून दिल्या. यानंतर त्यानं इमारतीलादेखील आग लावली.या घटनेचा तपास करताना पोलिसांनी इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेलं फुटेज तपासलं. त्यातून जाळपोळ करणाऱ्या पतीची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी तरुणाला अटक केली. अशीच एक घटना जुलै महिन्यात राजस्थानातल्या उदयपूरमध्ये घडली होती. पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली म्हणून उदयपूरमध्ये एका तरुणानं स्वत:ला डिटोनेटरनं उडवलं होतं.
पत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:13 AM