तामिलनाडू - देशातील तामिळनाडू राज्यातून, हृदयाला जबरदस्त हादरा देणारी अन् स्तब्ध करणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेच्या मृत्यूनंतर, तिचा मृतदेह तब्बल 20 दिवस घरातच ठेवण्यात आला आणि या 20 दिवस एक मांत्रिक तिच्या मुलांकडून आत्म्याला परत बोलवण्यासाठी पूजा करत राहिला. यादरम्यान हा मांत्रिक, 'अशी पूजा केल्याने देव त्यांच्या आईला परत पाठवेल, असा दिलासा या मुलांना सातत्याने देत होता.'
इंदिरा नावाची एक महिला दिंडीगूल येथील एका महिला पोलीस ठाण्यात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत होती. इदिरा यांना किडनीची समस्या होती. काही वर्षांपूर्वीच इंदिरा आपल्या मुलांना घेऊन वेगळे राहत होती. इंदिरा यांना 13 वर्षांचा मुलगा आणि एक 9 वर्षांची मुलगी आहे. या दोन्ही मुलांचा सांभाळ त्या एकट्याच करत होत्या.
किडनीच्या समस्येमुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्वैच्छा निवृत्तीसाठी पोलीस विभागाला विनंती केली होती. त्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्यात गेल्या नव्हत्या. यामुळे एक महिला काँस्टेबल इंदिरा यांच्या घरी त्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचल्या. तेव्हा घरात दोन मुलं होती आणि घरातून अत्यंत वाईट वास येत होता.
यावेळी या महिला काँस्टेबलने या मुलांना त्यांच्या आईसंदर्भात विचारले, यावर त्यांनी सांगितले, की आई झोपलेली आहे. तिला उठवायचे नाही अन्यथा देव त्यांचे नुकसान करेल. यावर शंका आल्याने त्या महिला काँस्टेबलने संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर, इंदिरा यांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, 20 दिवसांपूर्वीच इंदिरा यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या बाजुला पूजेचे साहित्यही आढळून आले. यावर पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांच्या लक्षात आले, की इंदिरा 7 डिसेंबरलाच बेशुद्ध झाल्या होत्या. मात्र, पूजारी सुदर्शनने दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले नाही. इंदिरा यांना रुग्णालयात नेऊ नका, अन्यथा देव यांचे रक्षण करणार नाही, असे या पुजाऱ्याने इंदिरा यांची मुलं आणि बहिणीला सांगितले होते.
पूजारी सुदर्शनदेखील तेव्हापासून आतापर्यंत या कुटुंबासोबत त्यांच्या घरात होता. घर बाहेरून बंद केल्यानंतर 20 दिवस इंदिरा यांच्या आत्म्याला परत आण्यासाठी पूजा करण्यात येत होती. या घटनेमुळे पोलीसही स्तब्ध झाले आहेत. सध्या पोलिसांनी, पूजारी सुदर्शन आणि इंदिरा यांच्या बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.