चेन्नई:तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निर्दयी पालकांनी आपल्या 4 मुलांना अवघ्या 62 हजार रुपयांना विकल्याची घटना घडली आहे. कोरोना महामारीनंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पती-पत्नीला मुलांचे संगोपन करणे इतके अवघड झाले की त्यांनी आपली मुले विकली. मात्र, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या सर्व मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांचे वय 9,9 8 आणि 6 वर्षे आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे जोडपे एका कोळशाच्या युनिटमध्ये काम करायचे. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या दोन मोठ्या मुलांना शेळीपालन करणाऱ्याला 50 हजारांना विकले. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये घर चालणे अवघड झाले होते. अशा परिस्थितीत खूप अडचणी येत होत्या. यामुळेच या पालकांना बळजबरीने हे पाऊल उचलावे लागले.
दोन लहान मुलांना 6-6 हजारात विकले
दोन मोठ्या मुलांना विकल्यानंतर गोविंदराजन नावाच्या व्यक्तीने पुन्हा एकदा या जोडप्याशी संपर्क साधला आणि दोन लहान मुलांना 6-6 हजार रुपयांना विकत घेण्याची ऑफर दिली. या व्यक्तीने मुलांच्या पालकांना वचन दिले की तो मुलांना अवघड कामे करायला लावणार नाही. पण, गोविंदराजनने मुलांवर खूप अत्याचार केले.
मात्र, एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या 4 मुलांची सुटका करण्यात आली आहे. एनजीओशी संबंधित एका सदस्याने सांगितले की, मुले विकत घेणारा आरोपी निरपराध लोकांचे शाब्दिक आणि शारीरिक शोषण करत असे. या माणसाच्या तावडीतून सुटका झालेल्या एका मुलाने सांगितले की, तो मुलांवर खूप अत्याचार करत असे. कामे न केल्यास बेदम मारहाण करायचा.
दुसर्या एका मुलाने सांगितले की, मुलांना दररोज किमान 10 किलोमीटर जनावरे चरायला घेऊन जावी लागत असे. सकाळी कामासाठी लवकर उठून संध्याकाळपर्यंत काम करुन घ्यायचा. याशिवाय दर तीन-चार महिन्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, गोविंदराजनविरोधात कारवाई करण्यात आली आहे.