चेन्नई - एका नेत्याच्या मुलीने आपले वडील आणि कुटुंबापासून धोका असल्याचं म्हणत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तामिळनाडूचे मंत्री डॉ. पी. के. शेखर बाबू (PK Sekar Babu) यांची नवविवाहित मुलगी जयकल्याणी हिने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध तामिळनाडूच्या व्यावसायिकाशी लग्न केले. आता आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तिने बंगळुरूमध्ये पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून चर्चा रंगली आहे.
एका रिपोर्टनुसार, धार्मिक आणि धर्मादाय व्यवस्थापन मंत्री पी. के. शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्याकडे सुरक्षा देण्याची विनंती केली आहे. आपले सतीश कुमार यांच्याशी लग्न झाले आहे आणि दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असे जनकल्याणीने पत्रकारांना सांगितले. आपल्याला आणि पतीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपण पोलीस संरक्षण मागितले आहे, असे तिने सांगितले.
कर्नाटकातील रायचूर येथील हलस्वामी मठात हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याचे लग्न झाले आहे, असं या जोडप्याला लग्नासाठी मदत करणाऱ्यांनी म्हटलं आहे. दोघांनीही आपल्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्या आई-वडिलांनी आमचे नाते स्वीकारलेले नाही. तामिळनाडू पोलिसांनी आपल्याला दोन महिने कोठडीत ठेवले, असा आरोप जयकल्याणी यांनी केला आहे. तसेच तिने एक व्हि़डीओ देखील पोस्ट केला आहे.
"माझे वडील एक प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळेच मी पुन्हा तामिळनाडूमध्ये परत येऊ शकत नाही. माझ्या पतीच्या जीवाला मोठा धोका आहे म्हणूनच पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करत आहे. आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलं आहे. आई-वडिलांना आमचं नातं मान्य नाही" असं जयकल्याणीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे पीके शेखर बाबू यांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.