नवी दिल्ली - तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तीन कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या चुलत भावाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. पैशासाठी तिने पतीला कारसह जिवंत जाळल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने आपण पकडले जाऊन नये म्हणून आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही संपूर्ण घटना अपघात असल्याचं भासवलं आहे. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता या घटनेचा उलगडा झाला आहे.
इरोड जिल्ह्यातील पेरुन्दुरई येथील 62 वर्षीय रंगराजन यांच्या पत्नीने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यांना कारमध्ये जाळून मारलं आहे. यासाठी महिलेने तिच्या काकाच्या मुलाची मदत घेतली होती. रंगराजन हे पावर लूम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. एक महिन्यापूर्वी त्यांचा एक अपघात झाला होता. त्यात ते जखमी झाले होते. कोईम्बतूरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रंगराजन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पत्नी ज्योती मणी (55) आणि तिच्या काकाचा मुलगा राजा (41) हे त्यांना व्हॅनमधून घरी घेऊन जात होते.
ज्योती आणि तिच्या भावाने आधीच रंगराजन यांच्या हत्येचा एक कट रचला होता. व्हॅनमधून जाताना पेरुमानल्लूरजवळ आग लागली. आम्ही कसाबसा जीव वाचवला. रंगराजन हे बाहेर पडू शकले नाहीत अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची अधिक चौकशी केली. रंगराजन यांची पत्नी आणि तिचा चुलत भाऊ या दोघांनीही वेगवेगळी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली.
रंगराजन यांच्या पत्नीने पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, पती रंगराजन यांनी तीन कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. त्यांच्यावर एक कोटी रुपयांचे कर्ज होते. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, ते पैशांची मागणी करत होते. तिच्या पतीने विम्याच्या रकमेत तिलाच वारसदार ठेवले होते. पत्नी ज्योती आणि राजा यांनी सांगितले की रंगराजन यांनीच हत्या करण्यास सांगितले होते आणि विम्याच्या रकमेतून कर्ज फेडण्यास सांगितले होते. त्यानंतर दोघांनीही हत्येचा कट रचला होता. रंगराजन यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पोलिसांनी हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.