गुजरातमधील सूरतमध्ये राहणाऱ्या मॉडेल तानिया सिंगच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीएल स्टार अभिषेक शर्माला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. यानंतर अभिषेक शर्मा पोलिसांसमोर हजर राहिला होता.
तानियाच्या मृत्यूला जबाबदार कोण?, याचा शोध पोलीस घेत आहेत. तानिया आणि अभिषेक शर्मा यांच्यात जवळीक होती. दोघांचे बरेच फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. अभिषेक शर्मा चौकशीसाठी सुरतमधील वेसू पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. पोलिसांनी तानियाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा जबाब घेतला आहे. अभिषेकने तानियाला काही मेसेज पाठवल्याचेही या प्रकरणात उघड झाले आहे. यातून बरेच काही उघड होऊ शकते.
तानियाने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरतमधील हॅप्पी एलिगन्सच्या बी-१ टॉवरच्या फ्लॅट क्रमांक ७०२ मध्ये आत्महत्या केली होती. हा परिसर वेसू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. तानियाने २३ वर्षांच्या अभिषेकला शेवटचा कॉल केला होता हे तपासात समोर आले. अशा परिस्थितीत पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप कोणताही महत्त्वाचा सुगावा लागलेला नाही.
२८ वर्षीय तानिया फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. इंस्टाग्रामवर तिचे १०००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सुरतमध्ये तपास सुरू केला. यादरम्यान आयपीएलमध्ये एसआरएच खेळाडू अभिषेक शर्माचे नाव पुढे आले. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळलं. तपासात असेही समोर आले की तानिया आणि अभिषेक काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात नव्हते, परंतु पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी बोलावले कारण तो तिचा मित्र होता.
अभिषेक शर्माची कारकीर्द-
तानिया सिंगच्या आत्महत्येमध्ये ज्याचे नाव पुढे आले आहे तो अभिषेक शर्मा सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आयपीएलमधील ४७ सामन्यांमध्ये १३७.३८च्या स्ट्राइक रेटने ८९३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७५ आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४ अर्धशतके आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. अभिषेकला सनरायझर्स हैदराबादने २०२२च्या आयपीएल लिलावात ६.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.