लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : औषध निर्मितीसाठी वापरात येणारे प्रोपेलिन ग्लायकोल हे केमिकल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ठाण्यातील कोपरी मुंबई नाशिक वाहिनीवर अपघात झाला. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर केमिकल सांडले. तर, सुदैवाने सांडलेले केमिकल ज्वलनशील नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच वाहतुक कोंडीही झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कंटेनर चालक देवीप्रसाद हा मे. पशुपती रोडलाईन मालकीचा कंटेनर घेऊन न्हावा शेवा येथून गुजरातला ठाणे मार्गे निघाला होता. त्या कंटेनरमध्ये २० गॅलन, प्रोपेलिन ग्लायकोल हे औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणे केमिकल होते. चालक कंटेनर घेऊन मुंबई नाशिक वाहिनीवरील कोपरी,हरिओम नगर, आनंद नगर जकात नाका पुढे आल्यावर त्याचा अपघात झाला. त्यातून मोठया प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले आहे. अशी माहिती मिळताच, घटनास्थळी कोपरी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. मात्र सांडलेले केमिकल ज्वलनशील नसल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही तसेच वाहतुक कोंडीचाही प्रश्न यावेळी निर्माण झाला नसल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.