Double Money Fraud : भोंदू बाबा कशाप्रकारे लोकांची फसवणूक करून त्यांना लुटतात याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण कधीना कधी हे भोंदू बाबा पकडले जातात. छत्तीसगढमधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका तांत्रिकाने एका व्यक्तीची अशी फसवणूक केली की, त्या व्यक्तीच्या लक्षातच आलं नाही. त्याने पैसे डबल करण्याच्या नावावर व्यक्तीचे अडीच लाख रूपये लुटले. भोंदू बाबाने व्यक्तीला सांगितलं की, तो एका मंत्राने पैसे डबल करून आकाशातून पैशाचा पाऊस पाडेल. पण नंतर त्याची पोलखोल झाली आणि त्याला पकडलं गेलं.
ही घटना छत्तीसगढच्या बलौदा बाजारमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे राहणाऱ्या रामगोपाल साहूकडे तांत्रिक दीनदयाल आपल्या मुलासोबत आला. त्यांनी रामगोपालला आपल्या खोट्या बोलण्यात अडकवलं. त्यांनी दावा केला की, जेवढे पैसे तू देणार त्याचे डबल करून आकाशातून पैशांचा पाऊस पाडणार. यासाठी तो एक मंत्र म्हणणार ज्याने पैसे डबल होतील.
रिपोर्ट्सनुसार, गेल्यावर्षी याबाबत सगळं काही ठरलं होतं. त्यानंतर रामगोपालने भोंदू बाबाच्या बोलण्यात येऊन आतापर्यंत त्याला अडीच लाख रूपये दिले. पण काही दिवसांआधी तांत्रिक आणि त्याचा मुलगा दोघेही फरार झाले. तेव्हा पीडित रामगोपलच्या लक्षात आलं की, त्याची फसवणूक झाली आहे. त्याने 19 एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून तांत्रिक आणि त्याच्या मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी तांत्रिक आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली. आरोपी दीनदयाल आणि त्याचा मुलगा पुरूषोत्तम यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.