मुंबई - अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणात काही पुरावेच मिळत नसल्याची कबुली ओशिवरा पोलिसांनी जूनमध्ये न्यायालयात दिली होती. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी आता तनुश्री दत्ताच्या वतीने तिचे वकील नितीन सातपुते यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मेलद्वारे याप्रकरणी तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. आज मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे प्रत्यक्ष पोलीस आयुक्त यांना भेटून अर्ज देणं शक्य नसल्याने मेलद्वारे विनंती करण्यात आली असल्याची माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आयुक्त यांना मेलद्वारे तक्रार कळविण्यात आली आहे. तसेच गुरुवारी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन तपास हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली जाईल असं सातपुते यांनी माहिती दिली.
‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘मी टू’ या चळवळीअंतर्गत केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जूनमध्ये न्यायालयात ओशिवरा पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल सादर केला. तनुश्रीने नाना यांच्याविरोधात जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे त्यांना सापडलेले नाहीत. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. संशयित आरोपीविरोधात कोणताच पुरावा सापडला नाही की पोलीस ‘बी समरी’ रिपोर्ट न्यायालयात सादर करतात. तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर अविश्वास दर्शवला होता. आता त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.