जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीएत. काही दिवसांपूर्वी शिक्षिकेची हत्या केल्यानंतर आज कुलगामध्ये बँकेत घुसून दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची हत्या केली आहे. यामध्ये मुळच्या राजस्थानच्या विजय कुमार यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये परराज्यातून आलेल्या लोकांची हत्या करण्याच्या घटना सुरु झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल भट याची हत्या करण्यात आली. यानंतर गेल्या आठवड्यात काश्मीरी पंडीत असलेल्या शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिने १९९० मध्ये काश्मीरमधून पलायन केले होते.
आज सकाळी सकाळी बँका सुरु होताच दहशतवाद्यांनी कुलगामच्या एका बँकेच्या मॅनेजरवर हल्ला करण्यात आला. विजय कुमार हे बँकेचे मॅनेजर होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काश्मीरी पंडितांनी परराज्यातून आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी केली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने बुधवारीच याबाबत आदेश दिले होते. ६ जूनपर्यंत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षित स्थळी ट्रान्सफर करण्यात येणार आहे. परंतू, त्या आधीच आणखी एक मोठी घटना घडली आहे. एकट्या मे महिन्यातच आठ घटना घडल्या आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी, जवान, वाइन शॉप चालक, टीव्ही आर्टिस्ट आणि शिक्षिकेला जीव गमवावा लागला आहे.