मुंबई – मनसुख हिरेन हत्याकांडात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा(Sachin Vaze) साथीदार विनायक शिंदे याच्या घरातून NIA ला एक डायरी सापडली आहे, या डायरीच्या आधारे हिरेन हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एटीएसनेही मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपास केल्यास मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती यातील रहस्य समोर येऊ शकतात असं म्हटलं आहे.
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता. जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्रकरण याआधीच उलगडलं असतं, परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग(EX CP Param Bir Singh) यांना चार पत्रही पाठवली होती, परंतु त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले.
तसेच एटीएसने अँटेलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांचा तपास करताना २५ फेब्रुवारीच्या ४५ दिवस अगोदरचे आणि घटनेच्या नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी मागितले होते, अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कोर्पिओ गाडी सापडली होती, ती १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान मुंबई पोलीस मुख्यालयात आणली होती अशी माहिती एटीएसला मिळाली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर याचा खुलासा होण्याची शक्यता होती. परंतु CCTV फुटेज तपासण्याचे आदेश एटीएसला मिळाले नाहीत, हे वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.
विनायक शिंदेच्या डायरीत वसुलीचा उल्लेख
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिंदे याच्या घरी जी डायरी सापडली त्यात वसुलीबाबत माहिती आहे, यात ३० पब आणि बारचे नाव, पत्ता आणि त्यांच्याकडून येणारी रक्कम किती याचा उल्लेख आहे, सचिन वाझेने ही जबाबदारी विनायक शिंदेला सोपवली होती. याशिवाय काही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यवसायांचे नाव आणि पत्ते आहेत.
बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं...
प्रत्येक महिन्याला २ लाखांचे टार्गेट
मुंबई पोलिसांनी जोडलेल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये वसूल करून सचिन वाझेंकडे पोहचवायचे होते, पोलीस ज्यावेळी कोणत्याही बियर बार, अवैध व्यवसायावर छापा टाकत होते, तेव्हा सचिन वाझेचा फोन यायचा आणि अटक केलेल्यांना सोडायला सांगितलं जायचं. सचिन वाझेकडे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांकडून लाखो रुपये सिक्युरिटी डीपॉझिट घेण्याचा नियम जगजाहीर होता. यात क्रिकेट बुकीपासून अनेक व्यवसायांचा समावेश होता.
प्रत्येक महिन्याला २८ कोटींची वसुली – संजय निरुपम
मुंबईत जवळपास १४०० बियरबार आणि अवैध धंदे आहेत, ज्यांच्याकडून महिन्याला २ लाख रुपये कमाई म्हणून महिन्याला २८ कोटीं वसूल होत होते, ही रक्कम पीआय पातळीपासून आयुक्त स्तरापर्यंत पोहचवली जात होती असं काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दावा केला. तसेच हे मुंबईत फारपूर्वीपासून सुरू आहे, कोणताही नवा नियम झाल्यानंतर पोलिसांची कमाई वाढत होती, हे सगळं पोलीस संरक्षणात होत असे, वसुलीचे प्रकार कधीही लपले नाहीत.