सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मारेकरू तळवली परिसरातले असून व्यावसायिक वादातूनच हत्या झाल्याचे कारण पुढे येत आहे. तर गुन्ह्यात वापरलेली कार कोपरखैरणे परिसरातून जप्त करण्यात आली आहे.
ऐरोली येथील रहिवासी बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे यांची गुरुवारी दुपारी तळवली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांना गुन्ह्यात वापर झालेल्या कारची माहिती मिळाली होती. त्यानुसार कार गेलेल्या मार्गावर रबाळे पोलिसांचे एक पथक शोध घेत होते. शुक्रवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर २ येथील वरिष्ठा हॉटेलसमोरील मार्गावर ही कार आढळली. कार सापडल्यानंतर मारेकरूंची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तळवली परिसरातच राहणाऱ्या व्यक्तीची ही कार आहे. ही व्यक्ती बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे.
काही महिन्यांपासून त्यांच्यात तळवलीतील भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्यावरून वाद सुरू होते. त्यानुसार संबंधितांची माहिती मिळविण्यास गुन्हे शाखेसह परिमंडळ पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. मारेकरूंनी घटनेच्या काही दिवस अगोदर तायडेंना धमकी दिली होती, असेही समजते. मात्र धमकी आल्याची त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती की नाही? याचा उलगडा झालेला नाही. परंतु धमकी मिळाल्यापासून तायडे काही पोलिसांच्या संपर्कात होते, असेही समजते.करंजाडे येथील टोळीचा हाततायडे यांचा काटा काढण्यासाठी पनवेलच्या करंजाडे येथील एका टोळीची मदत घेण्यात आली होती. यानुसार मागील काही दिवसांपासून ही टोळी तळवली परिसरात दबा धरून बसलेली होती. मात्र गोळीबारानंतर सर्वजण भूमिगत झाले आहेत. तर एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या टोळीने ज्याच्या सांगण्यावरून तायडेंची हत्या केली, त्याचीच कार गुन्ह्यासाठी वापरल्याने पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यास मदत झाली आहे.