उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला घेऊन शिक्षक पळून गेला. सध्या पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध एफआयआर नोंदवला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी संपूर्ण माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील नौतनवा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्व माध्यमिक शाळेतील आहे. 8 फेब्रुवारीला इयत्ता सहावीची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे तिच्या घरातून निघून शाळेत गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. त्याच दिवसापासून शाळेतील 45 वर्षीय शिक्षकही फरार आहे.
पोलिसांनी संशयाच्या आधारे घटनेच्या दिवसापासून गैरहजर असलेल्या शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांनीच आपल्या मुलीचा शोध सुरू केला आहे. नेपाळ आणि बिहारमधील अनेक शहरांमध्ये कुटुंबीय शोध घेत आहेत.
अधिकारी जय प्रकाश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी नेपाळचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.