नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,57,72,400 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,76,070 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,874 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,87,122 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना रुग्णालयात डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान अनेक भीषण घटना समोर येत आहेत. अनेकांनी या भयंकर परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लखनऊमध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षकाने चक्क डॉक्टर असल्याचं सांगून कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादाय़क प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. मात्र एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचं हे खोटं सर्वांसमोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या चिनहट येथील हे प्रकरण आहे. शशिवेंद्र पटेल असं या आरोपीचं नाव असून हा सरकारी शाळेत शिक्षक आहे. मात्र शशिवेंद्र स्वतःला कोर मेडिक्स इंडियाचा व्यवस्थापक आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षकाने रुग्णांना फसवून लुटले असल्याची त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. चिनहट पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तिने करोना झालेल्या नवऱ्याच्या उपचारासाठी त्याने आपल्याकडून मोठी रक्कम घेतल्याचे सांगितले. मात्र आरोपीने केलेल्या उपचारानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. पोलिसांनी अधिक तपास केला असता शशिवेंद्र स्वतःला आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
आरोपीने तक्रार नोंदवलेल्या महिलेच्या घरीच आयसीयूसारखी व्यवस्था केली होती. यासाठी त्याने पैसे देखील घेतले होते. मात्र उपचारानंतरही महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने उपचारांमध्ये झालेल्या चुकांमुळे पतीचा मृत्यू झाला असल्याची पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. आरोपी शिक्षक आपण डॉक्टर असून आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम असल्याचा दावा करत होता. तसेच यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराच्या नावे मोठी रक्कम घेत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त् दिले आहे.