बिहार – राज्यातील बेगुसराय येथे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी क्रूर घटना घडली आहे. याठिकाणी २ शिक्षकांनी त्यांच्या एका विद्यार्थ्याचा गंभीर छळ केल्याचं समोर आलं आहे. खासगी शाळेतील ही घटना आहे. जेथे १२ वर्षीय पीडित विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. क्षुल्लक कारणावरून शाळेचे शिक्षक राहुल आणि चंदन यांनी विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टला गरम लोखंडाचे चटके दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोना काळात घडलेल्या या घटनेने नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये रोष पसरला आहे. हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ही घटना शनिवारी घडली. या प्रकारामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. कोरोना काळात शाळा-कॉलेजपासून हॉस्टेल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कोविड नियमांचे उल्लंघन करत घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकांना अटक केली आहे.
चांदपूरा चित्तरंजन येथील रहिवासी रणवीर सहानी यांच्या पत्नी सुधा देवी यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा माझा मुलगा घरी परतला आणि आंघोळीसाठी गेला होता. तेव्हा त्याने कपडे हटवल्यानंतर त्याचा पार्श्वभागावर चटके दिल्याचं दिसून आलं. त्यात रक्त चिघळलं होतं. तेव्हा मुलाला विचारलं असता त्याने जे सांगितलं तेव्हा मी हादरले. प्रेमने त्याच्या आईला सांगितलं की, हॉस्टेलमध्ये शिक्षकांनी गरम लोखंडाने चटके दिले होते.
त्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन जोरदार गोंधळ घातला. पोलिसांना याची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि २ शिक्षकांना अटक केली. पीडित विद्यार्थी पीसी हायस्कूलच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. लॉकडाऊन असतानाही त्यांची शाळा सुरूच होती. लॉकडाऊन काळात मुलाला हॉस्टेलला ठेवलं होतं. याठिकाणी राहुल कुमार आणि चंदन कुमार या शिक्षकांच्या देखरेखीखाली त्याचे शिक्षण सुरू होते.
मागील शनिवारी संध्याकाळी काहीतरी कारणावरून आरोपी शिक्षक राहुल कुमार आणि चंदन कुमार यांना राग अनावर झाला. त्यावेळी या दोघांनी विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर गरम लोखंडी सळीने चटके दिले. त्यावेळी विद्यार्थ्याला भाजल्यामुळे त्याला सहन झालं नाही. तेव्हा शिक्षकांनी घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर शाळेतून नाव काढून टाकू अशी धमकी दिली. पण जेव्हा हा प्रकार घरच्यांना समजला तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या या दोन्ही शिक्षकांना अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.