जळगाव : मनपाची २० रूपयांची बाजार शुल्क पावती आत्ताच फाड म्हटल्यानंतर नकार दिल्याच्या कारणावरून एकाने शेख रफीक शेख हमिद मणियार (४०,रा.मासुमवाडी) या विक्रेत्याला फायटरने तोंडासह छाती, पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मासुमवाडी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हे हातगाडीवर कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ९ वाजता ते हातगाडी घेवून व्यावयासासाठी घरातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांना मनपाची २० रूपयांची बाजार शुल्क पावती फाडणारा व्यक्ती भेटला. त्याने त्यांना पावती फाडण्यास सांगितली. पण, मी आत्ताच घरातून बाहेर निघालो असून पावती देवून द्या, नंतर पैसे घेवून जा असे शेख यांनी सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने आत्ताच पावती फाड असे सांगितल्यानंतर शेख त्यांनी त्यास नकार दिला. त्याचा राग येवून त्याने बँगेतून फायटर काढत शेख यांच्या तोंडासह छाती व पोटावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. शेख यांनी लागलीच पोलिस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना प्रथम उपचार घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र उगले करीत आहेत.