उज्जैन – मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका अल्पवयीन मुलीनं हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहत होती. बॉयफ्रेंडही अल्पवयीन आहे. हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोघांनी पती-पत्नी असल्याचा बनाव केला. विवाहित जोडपं म्हणून त्यांना हॉटेलमध्ये रुम देण्यात आली होती. त्यानंतर जे घडलं त्याने हॉटेल व्यवस्थापनाची भंबेरी उडाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुला-मुलीने जोडपं असल्याचं सांगत हॉटेलमध्ये एक रुम घेतली. स्वत:ला विवाहित असल्याचं दाखवण्यासाठी या दोघांनी बनावट ओळखपत्रही दाखवले. सोमवारी रात्री मुलाचा मित्रही त्या हॉटेलमध्ये आला. त्यानंतर काही वेळातच मुलीने तिसऱ्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली असं पोलिसांनी सांगितले. बॉयफ्रेंडला मुलीवर शंका होती. मुलाच्या मित्रासोबत मुलीचे संबंध असल्याचा संशय त्याला आला. तोच मित्र सोमवारी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आला होता. बॉयफ्रेंडने मित्रासमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती देण्यात आली आहे.
बॉयफ्रेंड आणि हॉटेल मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी अल्पवयीन बॉयफ्रेंड आणि हॉटेल मॅनेजरविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मॅनेजरने बनावट ओळखपत्राच्या आधारे अल्पवयीन जोडप्याला हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली होती. सोमवारी हॉटेलमध्ये जो मित्र भेटायला आला त्याबद्दल पोलिसांनी आत्महत्येच्या घटनेत त्याची भूमिका सापडत नाही असा दावा केला आहे.
घटनेच्या वेळी अनेक लोक हॉटेलमध्ये थांबले होते
काही प्रत्यक्षदर्शींसोबत पोलिसांनी संवाद साधला असता घटनेच्यावेळी हॉटेलमध्ये खूप लोकं होती असं माहिती पडलं. पोलीस म्हणाले की, अनेकांनी मुलांना एकमेकांशी भांडताना पाहिलं होतं. त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले आहेत. हे दोघंही अल्पवयीन मुलं जेव्हापासून हॉटेलमध्ये राहत होते तेव्हापासून त्याच्या आईवडिलांना त्यांच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. विशेष म्हणजे पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नाही याने पोलीस हैराण आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. तर अल्पवयीन बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे.