एक अल्पवयीन मुलगा आणि मुलीची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आग्र्याहून धौलपूरला गेली. मुलगी १६ वर्षांची आणि मुलगा १७ वर्षांचा. दोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं. दोघांनाही घरातून पळून येण्याचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे.
बाल कल्याण समितीने दोघांच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली आहे. यादरम्यान दोघांचीही काउन्सेलिंग करण्यात आली. जेव्हा मुलीला समजलं की तिच्या प्रियकराकडे केवळ १४०० रूपये आहेत. इतक्या पैशात काहीच होणार नाही हे तिच्या लक्षात येताच मुलीने प्रियकरासोबत लग्नास नकार दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीने मुलाला कोविड सेंटरमध्ये तर मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवलं. (हे पण वाचा : फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध)
कल्याण समितीचे सदस्य गिरीश गुर्जर यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलगी आग्र्याची राहणारी आहे आणि मुलगा राजस्थानच्या धौलपूरचा आहे. दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. दोघांनाही लग्न करायचं होतं. त्यासाठी मुलगी पळून धौलपूरला आली होती. जेव्हा मुलीने प्रियकराला पगार किती आहे विचारलं त्याने १४०० रूपये सांगितले. यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला.
मुलीच्या परिवाराला याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना तिला नेण्यासाठी धौलपूरला बोलण्यात आलंय. सध्या मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवण्यात आलं आहे. समितीच्या सदस्यांनी सांगितलं की, मुलीच्या घरचे लोक आल्यावर मुलीचं हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.