हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जगतियाल शहरात राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलाने आई-वडिलांनी चित्रपट पाहण्यासाठी पैसे न दिल्याने आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पी नवदीप असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पी नवदीप हा अभिनेता पवन कुमारचा खूप मोठा चाहता होता, असे सांगितले जात आहे. पी नवदीपने पवन कुमारचा लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या मित्रांसोबत एक नियोजन बनवले होते. तसेच, चित्रपटाच्या तिकिटासाठी त्याने आई-वडिलांकडे 300 रुपये मागितले होते.
दरम्यान, पी नवदीपच्या वडिलांनी त्याला 300 रुपये देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांनी नकार दिल्याचा राग पी नवदीपला आला आणि त्याने घराच्या बाल्कनीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. पी नवदीपने आत्महत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.