सोलापूर : तब्बल १२ जनावरांच्या मुसक्या बांधून कत्तल खाण्याकडे निघालेला टेम्पो बार्शी शहर पोलिसानी पकडला. या कारवाईत चार जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
२ मे रोजी पहाटेच्या सुमारास मार्केट यार्डातून ही जनावरे घेऊन एक टेम्पो निघालेला होता. याबाबत टेम्पो मालक शिवाजी श्रीधर काळे (रा. कुसळंब, ता. बार्शी), चालक वसंत कृष्णा शिंदे (वय ६०, रा.धानोरे ता.बार्शी), आलिम सौदागर (रा.बार्शी) या तिघांना अटक केली. चौथा आरोपी रमजान सौदागर (रा.बार्शी) हा कारमधून पळून गेला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश अनंतकवळस यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार ही जनावरे बार्शी बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारातून खरेदी करून ती उस्मानाबादेत कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला आणि टेम्पोतून ही जनावरे मार्केट यार्ड येथून नाळे प्लॉटकडे जात असताना पकडली. तपासणी दरम्यान ही जनावरे दाटीवाटीत भरून त्यांच्या मुसक्या बांधून ठेवलेली दिसली. दरम्यान चालकाला ताब्यात घेऊन विचारले असता धारशिवला कत्तलीसाठी ही जनावरे घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसानी ती जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत व्यवस्था केली.