औरंगाबाद: वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल अधिकाऱ्यांनी जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारता उभा करून ठेवलेला टेम्पों परस्पर पळविणाऱ्या टेम्पो मालकाला गुन्हेशाखेने अटक केली.
अकिल खान गोरे खान (रा.किराडपुरा)असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूची चोरटी वाहतूक करताना आरोपी अकिलखान गोरे खान यांचा टेम्पो(एमएच-१७एजी २२५५) महसूल विभगाने पकडून तहसील कार्यालच्या आवारात जप्त करून ठेवला होता. हा टेम्पो २८ ते २९ सप्टेंबर दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार सिटीचौक ठाण्यात महसूलचे कर्मचारी शशीकांत मनोहर ठेंगे यांनी नोंदविली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे, कर्मचारी सय्यद मुजीब अली, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, आनंद वाहुळ यांनी तपास केला तेव्हा हा गुन्हा टेम्पोमालक अकिलखान गोरेखान आणि चालक सत्तार खान गफुर खान यांनी चोरल्याचे समोर आले. हर्सूल टी पॉर्इंट ते दिल्लीगेट रस्त्यावर हा टेम्पो उभा असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अकिलखानला अटक केली आणि त्याच्याकडून टेम्पो हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपी वाहनचालक सत्तार खान यास यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.