माणगाव : तालुक्यात मौजे नगरोली फाटा येथे टेम्पोने एसटीला धडक दिली. या अपघातात एसटीतील १५ जण, तर टेम्पोमधील ४ प्रवासी जखमी झाले. टेम्पोचालकाचा मृत्यू झाला.
माणगाव पोलीस ठाणे हद्दीत २८ जानेवारी रोजी सायंकाली ६.४५ वाजण्याच्या सुमारास अनंत मोतीराम वाघमारे (४०, रा. भाले आदीवासीवाडी, पो. निजामपूर, ता. माणगाव) टेम्पो क्र. एमएच-०६/एक्यू/९७८० मध्ये भाताचे तूस भरून कामगारांना सोबत घेऊन मुंबई बाजूकडून इंदापूर बाजूकडे स्वत: चालवत घेऊन जात होता. मुंबई- गोवा महामार्गावर येत असताना मौजे नगरोली फाटा येथे आल्यावर टेम्पो हयगयीने, बेदरकारपणे, चालवून राँग साइडला जाऊन समोरून गोव्याकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या एसटीस क्र. एमएच/२०/एल ०९०३ ला धडक दिली. या अपघातामध्ये एसटीचालक, वाहक यांच्यासह १३ प्रवासी, असे १५ जण, तसेच अपघातग्रस्त टेम्पोमधील ४ प्रवासी जखमी झाले, तर टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मपोसई प्रियांका बुरुंगले या करीत आहेत.