नागपूर (रामटेक) : सहलीसाठी आलेल्या सहापैकी दोन मित्रांचा रामटेक येथील अंबाडा तलावात बुडून मृत्यू झाला. निसर्ग प्रभाकर वाघ (१८) व कुणाल अशोक नेवारे (१८) दोघेही रा.रविनगर, नागपूर अशी मृत युवकांची नावे आहेत.
शासनाने अनलॉक केले आणि पर्यटक सैरभैर झाले. नागपुरातील सुखवस्तू कुटुंबातील सहा युवक मंगळवारी रामटेकच्या अंबाडा तलाव परीसरात सहलीसाठी आले होते. पोहता येत नसतानाही तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले. मौजमस्ती करता करता चार युवक तलावात बुडायला लागले. यात दोघांनी एकमेकाला वाचविले. पण दोघांना जलसमाधी मिळाली.
नागपूर येथून निसर्ग वाघ, कुणाल नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे व लक्ष्मीकांत बबडीलवार हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनाने अंबाडा येथे पोहोचले. सध्या मंदीर व तिर्थक्षेञ बंद आहे. येथे तपासणी नाक्यावर त्यांची गाडी थांबविण्यात आली. यानंतर या तरुणांनी गाडी बाजूला लावत पायीच अंबाडा तलाव गाठला. यातील चार युवक पोहण्यासाठी तलावात उतरले. येथे मौजमस्ती करता करता चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यापैकी अभिनव जिचकार याने प्रणय वासनिक याला बाहेर खिचून वाचविले. पण निसर्ग व कुणाल यांचा बुडून मृत्यू झाला.
निसर्गचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांनी बाहेर काढला. पण वृत लिहीत पर्यंत मात्र कुणालचा मृतदेह मिळाला नव्हता. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला यावेळी पाचारण करण्यात आले. पण त्यांनाही एक मृतदेह मिळाला नाही. त्यांचे प्रयत्न सुरु आहे. निसर्ग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालय रवाना करण्यात आला. घटनेचा तपास तपास पीएसआय शिवाजी बोरकर,पोलीस शिपाई संतोष मारबते करीत आहेत.