मडगाव: सुरक्षतेसाठी म्हणून लोक मोठय़ा विश्वासाने बँकेतील लॉकरमध्ये आपली सुवर्णपुंजी ठेवतात, मात्र लॉकरमधूनच सुवर्णलंकार गायब झाले तर त्याला म्हणावे तरी काय. गोव्यातील मडगाव या शहरातील एका बँकेच्या लॉकरमधून अंदाजे दहा लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने गायब होण्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी मूळ मुर्डे - नावेली येथील फिलोमिना डिसिल्वा या सत्तर वर्षीय वृध्देने मडगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही नोंदविली आहे. आम्ही या प्रकरणाचा सदया तपास करीत असल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. पोलिसांनी आज सांयकाळी त्या बँकेच्या मॅनेजराला बोलावून घेउन चौकशीही केली. सदया या प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फिलोमिना डिसिल्वा या शहरातील एका बँकेत लॉकर आहे. वीस ऑगस्ट रोजी डिसिल्वा या त्या बँकेत गेल्या होत्या. लॉकरमधील सुवर्णलंकार तिने बघितले होते. डिसिल्वा यांचा मुलगा एडर डिसिल्वा हा विदेशात जहाजावर कामाला असून, ािसमस निमित्त तो गावी आला होता. नाताळाला अंगावर घालण्यासाठी सोने पाहिजे म्हणून लॉकरमधून काढण्यासाठी तो गेला असता, त्याला आपले दागिने गायब झाल्याचे आढळून आले. मागाहून यासंबधी पोलिसांना कळविण्यात आले.लॉकरमध्ये सोन्याच्या दोन बांगडया, नेकलेस, कर्णफुले, दोन सोनसाखळी, सोन्याचे बिस्कीट व अन्य दागिने होते. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूजय कोरगावकर पुढील तपास करीत आहेत.
मडगावात एका बँकेच्या लॉकरमधून दहा लाखांचे सुवर्णलंकार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:41 PM