नवी मुंबई : वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त केले. शहरात काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. या दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रूपेश नाईक यांच्या पथकाने दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून दोन टोळीच्या पाच जणांना अटक केली आहे. एका टोळीत मोहम्मद आताबुर, तोहीद शेख, मोहम्मद इस्माईल युसूफ खान यांचा समावेश आहे. तीन गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून, त्यामधील तीन मोबाइल व चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. तर दुसऱ्या टोळीत राजनाथ कहार व महेश चौहान यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रबाळे येथील एका गुन्ह्याची उकल झाली असून, वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले सात मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. या दोन्ही टोळ्यांकडून इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दोन टोळ्यांकडून दहा मोबाइल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:20 AM