नांदेड : शासन वितरण व्यवस्थेतील गहू आणि तांदळाचे काळ्या बाजारात जाणारे दहा ट्रक कुंटुर ठाण्याच्या हद्दीत पकडले़ बुधवारी रात्री उशिरा नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने सदर कारवाई करण्यात आली़. कारवाईत तांदूळ, गहू आणि १० ट्रक असा एकूण १ कोटी ८३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आल्याची माहिती आहे़
तुप्पा येथील फूड कापोर्रेशन आॅफ इंडिया (एफसीआय) येथील गोडावूनमधून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू आणि तांदूळ कृष्णूर आद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली़ दरम्यान, पोलीस अधीक्षक मिना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी जवाहरनगर येथून निघालेल्या ट्रक ताफ्याचा पाठलाग करून त्यांना कृष्णूर आद्योगिक वसाहतीत पोहचताच पकडले.
पकडलेल्या गव्हाची किंमत ७५ लाख ९५ हजार आहे. तांदुळाची किंमत ७ लाख ५४ हजार आणि पकडलेल्या १० ट्रकची किंमत १ कोटी असा एकूण १ कोटी ८३ लाख ४९ हजार रूपयांचा माल आहे़ त्याचबरोबर पकडलेल्या दहा ट्रकपैकी तीन ट्रक नांदेड जिल्ह्यात शासकीय धान्य पुरवठा ठेकेदाराचे तर सात हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे़. याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात शिवप्रकाश मुळे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक, ठेकेदार, कंपनी मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मरे हे करीत आहेत़