इंद्रपाल कटकवार /भंडारा: चार वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विनयभंग करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला दहा वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. पी. बी. तिजारे यांनी शुक्रवारी सुनावला. बाल्या हरी दमाहे रा. खमारी बूज ता.भंडारा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही २२ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दहावीचा पेपर देण्याकरिता गेली होती. मात्र घरी परत आली नाही. मुलीच्या वडिलाने घरी परत न आल्याने नातेवाईकांकडे विचारपूस केली. अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी मोहाडी पोलिसात दिली २४ मार्च २०१९ ला दिली. यानंतर बाल्या हरी दमाहे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचे मुलीनेच सांगितले. बाल्याने मुलीला पळवून नेत तिच्या भावाला मारण्याची धमकी दिली होती. तसेच तिला देव्हाडी येथून रेल्वेने उत्तरप्रदेश येथे नेले. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बाल्या दमाहेला अटक केली.
या प्रकरणी खटला जिल्हा व सत्र न्या. पी. बी तिजारे यांच्या न्यायालयात चालला. साक्षीदार व पुराव्याच्या आधारे बाल्या दमाहे याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. तिजारे यांनी दमाहे याला दहा वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागेल. तसेच कलम सहा अंतर्गत दहा वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच ३५४ कलमान्वये एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ५०६ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षाही ठोकवण्यात आली.
प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपअधीक्षक विजय डोळस, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार राजेश गजभिये यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाकडून ॲड. दुर्गा तलमले यांनी कौशल्यपूर्ण मांडणी केली.