पुणे : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची विशेष न्यायाधिश आर. व्ही. आदोणे यांनी सुनाविली. मिथुन तानाजी मोरे (वय २३) असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. मयूरी मिथुन मोरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. १४ मार्च २०१२ रोजी ही घटना घडली. मिथुनच्या आई-वडिलांना वेगळे राहण्यास सांगितल्याने मिथुन आणि मयुरी यांनी स्वतंत्र संसार थाटला होता. आई-वडिलांनी वेगळे राहण्यास सांगितल्यामुळे मिथुन हा रोज दारू पिऊन घरी येत असे. मयुरी ही सहा महिन्यांची गरोदर होती. घटनेच्या दिवशी तीने मिथून याला जन्माला येणा-या बाळाचा विचार करून दारू न पिण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मिथुन याने गमतीने मयुरीला त्याला मारण्यास सांगितले. त्यानुसार मयुरीने त्याच्या गालावर हलकी चापट मारली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याने मयुरीला बेदम मारहाण केली. त्यावेळी तू माहेरी निघून जा मी तुला नांदवणार नाही, असे मिथुनने तिला सांगितले. मात्र, मयूरीने माहेरी जाण्यास नकार देत मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. मयूरीने घरातील रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये त्यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपासी अधिकारी, मृत्युपूर्वी साक्ष नोंदवणारे नायब तहसीलदार, तक्रारदार यांची साक्ष महत्वाची ठरली. खटला गंभीर असून, घटनेच्या दिवशी मयूरी या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या, असा युक्तिवाद अॅड. पाठक यांनी केली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कैद भोगावी लागले, असे निकालात नमूद आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये पोलीस कर्मचारी आर. एन. नागवडे यांनी मदत केली. पैरवी अधिकारी म्हणून कुंभार यांनी काम पाहिले.
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 1:24 PM