उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा परिसरात एका घर मालकाच्या हत्येचा खुलासा समोर आला आहे. भाडेकरूनेच मालकाची हत्या केल्याचं तपासात उघड झालं. घरमालकाने माझ्यासोबत राहणाऱ्या लिव्ह इन पार्टनरची छेड काढली. त्या रागातून मी सर्जिकल ब्लेड आणि हातोड्याने त्याची हत्या केली अशी कबुली गुन्हेगाराने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले होते.
कुलेसरा गावातील संजय विहार कॉलनीत हा प्रकार घडला. दिल्लीच्या कुंडली इथं राहणाऱ्या डॉक्टर दिनेश गौड यांचं संजय विहार कॉलनीत घर आहे. दिनेश यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांचे ऑफिस बनवले होते. २३ जानेवारीला दिनेशने त्याच्या घरातील एक खोली कुशीनगर इथल्या इम्तियाज आणि त्याच्या प्रेयसीला भाड्याने दिली होती. आरोपी इम्तियाजने तपासात सांगितले की, दिनेशची माझ्या पार्टनरवर वाईट नजर होती. माझ्या प्रेयसीची तो छेड काढायचा. एकदा आक्षेपार्ह स्थितीत दिनेशला पाहिल्यानंतर माझा संताप अनावर झाला. त्यानंतर हातोडा आणि सर्जिकल ब्लेडने त्याच्यावर हल्ला केला. त्यात दिनेशचा मृत्यू झाला त्यानंतर मी फरार झालो असं त्याने पोलिसांना सांगितले.
नेमकं काय घडलं?
२५ जानेवारीला मृत दिनेश दारू पिऊन बाटलीसह भाडेकरूच्या घरी गेला होता. त्याने इम्तियाज आणि त्याच्या प्रेयसीला खोलीत बोलावले. त्यानंतर काही बहाण्याने दिनेशने इम्तियाजला खोलीबाहेर पाठवले. त्याचवेळी दिनेश इम्तियाजच्या प्रेयसीवर जबरदस्ती करू लागला. प्रेयसीसोबत होणारा प्रकार पाहून इम्तियाजला राग आला. त्यानंतर दिनेश आणि इम्तियाज यांच्यात झटापट झाली. या झटापटीत दिनेशवर इम्तियाजने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, दिनेशने दारूच्या नशेत इम्तियाजवर हल्ला करण्यासाठी सर्जिकल ब्लेड हाती घेतलं. त्यावेळी इम्तियाजने खोलीत ठेवलेला हातोडा प्रतिकारासाठी घेतला. इम्तियाजने दिनेशवर हातोड्याने प्रहार केला त्यावेळी तो खाली पडला. त्यानंतर आरोपी इम्तियाजने सर्जिकल ब्लेड खेचून दिनेशच्या पोटावर वार केले. या हत्येनंतर आरोपी आणि त्याची प्रेयसी फरार झाली. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली असून हत्येत वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.