जळगाव - जळगावातून पळून गेलेले प्रेमीयुगुल लग्न करुन न्यायालयात हजर झाल्याने न्यायालय आवारात तणाव निर्माण झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता न्यायालय आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रेमीयुगुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
जळगावातील करिश्मा (२५) व सागर (२४) यांच्यात गेल्या पाच वर्षापासून प्रेमप्रकरण होते. कुटुंबाचा लग्नाला होणारा विरोध पाहता दोघांनी २८ मार्च रोजी घरातून पलायन केले. या दोघांनी भिवंडी येथे लग्न केले. सागर व त्याच्या कुटुंबाने मुलीला पळवून डांबून ठेवल्याचा अर्ज करिश्माच्या आईने न्यायालयात दिला. त्यावरुनकरिश्मा व सागर या दोघांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले होते. सोमवारी हे प्रेमीयुगुल न्या.जी.जी.कांबळे यांच्यासमोर हजर झाले. या दोघांना नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेच्या पार्श्वभूमीवर न्या. कांबळे यांनी दोघांच्या पालकांना बोलावून कायदा हातात घेऊ नका, अशी समज दिली.
प्रेमीयुगुल न्यायालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर करिश्माच्या पालकांकडील काही लोकांचा जमाव करिश्माच्या दिशेने चालत आला. तिला ओढून ताब्यात घेणार तितक्यात पोलीस हेकॉ.रामकृष्ण पाटील यांनी समयसूचकता बाळगून तातडीने करिश्माला सुरक्षितरित्या न्यायालयात आणले. यानंतर न्यायालायात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.