राजधानी दिल्लीतील काल प्रजासत्ताक दिनी एक खळबळजनक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या पाठलाग करत गोळ्या झाडून तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात भर बाजारात तरुणावर गोळ्या झाडण्यात आला. गोळीबारानंतर तरुण खाली कोसळताच आरोपींनी त्याच्यावर चाकूनेही सपासप वार केले आणि घटनास्थळाहून पळ काढला. तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. हे सगळं हत्याकांड एका दुकानाबाहेर झालं. मात्र तरुणाला वाचवण्यासाठी धावण्याऐवजी दुकानदार आपल्या दुकानातील सामान आवरण्यात व्यग्र असल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. तसंच आरोपी पळून गेल्यानंतरही दुकानदाराने तरुणाला उचललं नाही किंवा पोलिसांनाही या घटनेबाबत कळवलं नाही.
काही वेळानंतर तरुणावर झालेल्या हल्ल्याची बाब इतर नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी सदर तरुणाला मृत घोषित केलं.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवली जात असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दारू पिताना झालेल्या वादाचं रुपांतर नंतर भयंकर हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.