जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गस्तीवर असलेल्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील ह्यगाम भागात संशयित दहशतवाद्यांनी गस्त घालत असलेल्या सैनिकांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी ह्यगाममधील टाईमपास हॉटेलजवळ लष्कराच्या संयुक्त नाका पथक, सीआरपीएफ आणि पोलिसांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने हल्ल्याला प्रत्युत्तर देत कारवाई केली, परंतु दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैन्याचा एक सैनिक जखमी झाला आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
आज झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार
विशेष म्हणजे आज पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याची कंठस्थान घातले आहे. कामराजीपोराच्या सफरचंद बागेत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांबाबत सुरक्षा दलाला माहिती मिळाली. त्यानंतरच्या कारवाईत एक अतिरेकी ठार झाला, तर एक सैनिकही शहीद झाला. मृत दहशतवाद्याचे नाव आझाद ललहरी असं नाव असून तो हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता.