नवी दिल्ली - आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राजधानी दिल्लीत 'जैश - ए- मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असून त्यानुसार सुरक्षा यंत्रणांना कंबर कसून योग्य ती दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर येत्या १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत संघटना असल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांनी मिळाली आहे.
इब्राहिम असगर हा 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर येत्या १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जैश हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाला देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत: काश्मिरात दाखल झाले आहेत. शोपियां आणि दक्षिण काश्मीरच्या काही भागांवर दहशतवादाचे सावट आहे. २०१६ मध्ये बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश देतानाच डोवाल यांनी या सर्व भागांमध्ये अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंची कमतरता पडू नये म्हणून सूचनाही दिल्या आहेत.