बंगळुरू: कर्नाटकातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांना कट्टरतावादी बनवले जात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाली. या माहितीच्या आधारे एनआयने मंगळवारी पहाटे 7 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. एनआयएचे अधिकारी 17 ठिकाणी शोध घेत आहेत. हे छापे बंगळुरू बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जात आहेत.
एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात असी माहिती समोर आली आहे की, बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये कैद असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी टी नाझीर हिंसक कारवाया करण्यासाठी कैद्यांना कट्टरतावादाचे धडे देत होता. बंगळुरू शहर पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सात पिस्तूल, चार हातबॉम्ब, एक मॅगझिन, 45 जिवंत काडतुसे आणि चार वॉकी-टॉकी जप्त केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एनआयएच्या पथकांनी यापूर्वी मोहम्मद उमर, मोहम्मद फैसल रब्बानी, तन्वीर अहमद आणि मोहम्मद फारूक तसेच फरारी जुनैद यांच्या ठिकाणांवर छापे टाकून अनेक डिजिटल उपकरणे, गुन्ह्यातील कागदपत्रे आणि रोख 7.3 लाख रुपये जप्त केले होते. एजन्सीच्या प्रवक्त्याने यापूर्वी खुलासा केला होता की, उमर, रब्बानी, अहमद, फारूक आणि जुनैद हे लष्कर-ए-तैयबाशी संबधित असून, ते सर्व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या टी नाझीरच्या संपर्कात होते.