लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे. पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती के. जी. पढेलवार यांच्या कोर्टासमोर शुक्रवारी सुनावणीदरम्यान या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार सायबर तज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाली. हत्येच्या दिवशी बिद्रे आणि आरोपी अभय कुरुंदकर यांचा एकत्र असलेला टाइमलाइनचा नकाशा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. ८ जुलै रोजी बंगेरा यांच्या साक्षीला सुरुवात झाली होती.
बंगेरा यांनी बिद्रे यांच्या मोबाइलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाइलवरून आणि फेसबुक, व्हॉट्सॲप, लॅपटॉप, सर्व सोशल ॲपमधून महत्त्वाचा डेटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरच्या आरती कुरुंदकर@जीमेल डॉट कॉम’ हा मेल आयडी ओपन करून गुगल ड्राइव्हमधील व्हॉट्सॲप नंबर नवीन मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले आणि त्यावरील व्हॉट्सॲप चॅटच्या प्रिंटआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या. त्या कोर्टात दाखविल्या असता ओळखल्या. हत्येच्या दुसऱ्या रात्री १२.२२ ते १.१२ पर्यंत कुरुंदकर, इतर आरोपी वसई खाडी परिसरात चालत असल्याचा तो नकाशा कोर्टास दाखविल्यावर तोही मान्य केला.
१२ ऑगस्टला होणार उलटतपासणी बिद्रे यांच्या ईमेल आयडीवरून गुगल ड्राइव्हच्या टाइमलाइन गेल्यावर कुरुंदकर आणि बिद्रेचे एकत्र असलेले ५० फोटो आणि त्याच्या प्रिंटआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या. ते कोर्टासमोर दाखविल्यावर त्या आपणच काढल्या आहेत, अशी साक्ष बंगेरा यांनी दिली. बंगेराची साक्ष पूर्ण झाली. आता १२ ऑगस्ट रोजी उलटतपासणी होणार आहे. शुक्रवारी कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, राजू गोरे, एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी, आरोपीचे वकील आणि आरोपी हजर होते.