लोकमत न्यूज नेटवर्क
जालना, वाटूर : राज्यात गाजत असलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका एजंटच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरून पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथील प्रा. सुनील कायंदे तसेच शहर भागातील एका शिक्षकाच्या घरी झाडाझडती घेतली. सुमारे अडीच तास झाडाझडती सुरु असताना सुनील कायंदे फोन बंद करून गायब झाला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.
आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) भरती परीक्षेतील पेपरफुटी उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आता शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) पेपरफुटी उघडकीस आणली आहे. पेपरफुटी प्रकरणाची माहिती एक एजंट देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात तो जालना जिल्ह्यातील प्रा. सुनील कायंदे व अन्य एका व्यक्ती यांचे नाव घेत टीईटी पास होण्यासाठी पैसे दिल्याचे सांगतो आहे.यावरून पुणे येथील गुन्हे शाखेच्या एका पथकाने वाटूर येथील प्रा. कायंदे यांच्या घरी सकाळी ९ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी सुनील कायंदे हे घरी नसल्याचे पथकाला कळाले. पोलिसांनी कायंदे यांचे वडील व पत्नीची चौकशी केली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता, काहीच सापडले नाही. त्यामुळे पथकाला माघारी परतावे लागले.
दरम्यान, माझे पती हे प्राध्यापक आहेत. आमची समाजात चांगली प्रतिष्ठा आहे. आम्हाला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कायंदे यांच्या पत्नी नंदा कायंदे यांनी सांगितले. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे गुन्हे शाखेचे पथक पहाटेच जालन्यात दाखल झाले. शहरातील एका भागात राहत असलेल्या शिक्षकाच्या घराचीही पथकाने झडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु सदरील शिक्षक घरी नसल्याने पथकाला माघारी परतावे लागले, असे पुणे पोलिसांनी सांगितले.