ठाणे : मसाज पार्लरच्या नावाखाली थायलंड देशातून आणलेल्या तरुणींना देहविक्रीसाठी तयार करुन उल्हासनगरमध्ये सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी रामदास या पाचव्या आरोपीलाही अटक झाली आहे. यातील आरोपींची संख्या आता पाच झाली असून या पाचही आरोपींना ५ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी ठाणे न्यायालयाने दिले.
या उल्हासनगरच्या सितारा लाजिंग अॅन्ड बोर्डिंग या हॉटेलमध्ये थायलंडच्या मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हॉटेलचा मॅनेजर कुलदिप उर्फ पंकज सिंग (३७, रा. उल्हासनगर) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने २ ऑक्टोबर राजी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून २१ ते ३० वर्षीय १५ थायी पीडित तरुणींची सुटकाही केली आहे. याच प्रकरणामध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक नरेश पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे यांच्या पथकाने हॉटेलचा आणखी एक कर्मचारी रामदास यालाही अटक केली आहे.
या आरोपींनी या मुलींना कोणाच्यामार्फत उल्हासनगरमध्ये आणले. त्यांना नेमकी यातील किती पैसे दिले जात होते? हॉटेल मॅनेजर यातील किती रक्कम घेत होता? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणखी काही मुलींना अशाच प्रकारे या रॅकेटमध्ये ओढण्यात आले का? या सर्व बाबींचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईतील एका दुभाषकाचा मदतीने थायी मुलींशी संवाद साधून त्यांच्याकडेही या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या मुलींना एका सुधारगृहात ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.