ठाणे : ट्रान्सपोर्ट वाहनांवर ओव्हर लोडींगची कारवाई न करण्यासाठी गाडी मागे चार हजार रुपये असे पाच गाड्यांचे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत, ती रक्कम स्वीकारताना आरटीओ एजंट जावेद अकबर शेख (33) याला पुणे आरटीओच्या वाहन चाचणी दिवे केंद्र येथे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) रंगेहात बुधवारी पकडले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. तसेच याप्रकरणी ठाणे कार्यालयात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात असल्याची माहिती ठाणे एसीबी विभागाने दिली.
अशाप्रकारे कारवाईची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. तक्रारदार हे पुण्याचे राहणारे असून ते ट्रान्सपोर्ट कार्यालयात कामाला आहेत. त्यांच्या ट्रान्सपोर्टमधील वाहनावर पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील आरटीओ कार्यालयाकडून लोडिंग ची कारवाई करण्यासाठी प्रत्येक गाडीचे 4 हजार असे एकूण पाच गाड्यांचे 20 हजार रुपये आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावे मागणी 4 एजंट यांनी केली. अशी तक्रार 5 मार्च रोजी ठाणे एसीबी कार्यालयात दाखल झाली होती.
त्यानुसार ठाणे एसीबीच्या चार जणांच्या पथकाने 6 मार्च रोजी याप्रकरणी पुण्यातील जावेद शेख या आरटीओ एजंटला पुण्यातील पुरंदर तालुक्यामधील वाहन तपासणी केंद्र दिवे येथे रंगेहात पकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शेख यांच्या देवेंद्र खिंवसरा, गिरीश भोंगळे, भावड्या चौधरी अशा पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील चार आरटीओ एजंटविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या फरार तिघांचा शोध सुरू असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश जागडे करत आहेत.