ठाणे : ठाण्यातील खोपट येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. तिच्या ताब्यातून दोन पिडित महिलांचीही सुटका केली आहे.
ठाणे शहरासह लोणावळा, पुणे आणि मुंबई अशा वेगवेगळया भागात एक महिला गरीब तरुणींना शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवित असून ती खोपट परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २० जुलै २०२२ रोजी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, पोलीस हवालदार वालगुडे आदींच्या पथकाने या ठिकाणी एका बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. त्यावेळी एक महिला दलाल तरुणींना पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे आढळले.
या प्रकरणी महिलेस अटक करण्यात आली आहे. तर तिच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्या तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.