Human Trafficking in Thane: ठाण्यातील आई-वडील, बदलापूरचा ग्राहक आणि नागपूरचा दलाल. मानवी तस्करी पथकाने जेव्हा बालक तस्करीचा पर्दाफाश केला तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना घडली ती ठाणे जिल्ह्यात! या प्रकरणात पोलिसांनी बालकाचे आई-वडील, ग्राहक आणि दलाल अशा सहा जणांना अटक केली. मुलाला विक्री करण्याचे कारणही तपासातून समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने मोहीम राबवत अवैध बाल तस्करी पथकांचा पर्दाफाश केला. ज्यांनी मुलाला खरेदी केले, त्यांना दत्तक घ्यायचे होते, पण एका कारणामुळे पैशाची देवाण-घेवाण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांनी मुलाला विकत घेतले, त्यांना दत्तक घ्यायचे होते. पण, आई-वडिलांनी १ लाख १० हजार रुपयांना विकले आणि दत्तक प्रक्रिया टाळण्यात आली. हा व्यवहार घडवून आणण्यात नागपूरचा एक दलालही सहभागी होता.
5 दिवसांच्या चिमुकल्याला आई-वडिलांनी का विकले?
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील ऊर्फ भोंडू दयाराम गेंद्रे (वय ३१) आणि पत्नी श्वेता (वय २७) अशी मुलाच्या आईवडिलाचे नाव आहे.
ज्यांनी मुलाला दत्तक घेतले त्यांची नावे पौर्णिमा शेळके (वय ३२), तिचा पती स्नेहदीप धरमदास शेळके (वय ४७) अशी आहेत. आरोपी बदलापूरमधील रहिवासी आहेत.
नागपूरच्या दलालांनी केली मध्यस्थी
पोलिसांनी या प्रकरणात किरण इंगळे (वय ४१), तिचा पती प्रमोद इंगळे (वय ४५) यांना अटक केली आहे. गेंद्रे दाम्पत्याने २२ ऑगस्ट रोजी आपल्या मुलाची किरण आणि प्रमोद यांच्या माध्यमातून शेळके दाम्पत्याला विक्री केली.
नागपूर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पोलिसांनी सांगितले की, शेळके दाम्पत्य किरण इंगळेचे नातेवाईक आहेत. त्यांनी एक लाख १० हजार रुपये दिले आणि मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण न करता घरी घेऊन गेले. या व्यवहाराचे बिंग फुटले आणि पोलिसांनी बाल तस्करी प्रतिबंधक नियमानुसार कारवाई केली.
या प्रकरणात नागपूरमधील कलमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागपूरमध्येच खटला चालणार आहे. बालकाला अनाथलयात ठेवण्यात आले आहे.