- जितेंद्र कालेकर ठाणे - थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर कळवा परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सोमेश जयस्वाल (२२, रा. मध्यप्रदेश) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून दोन लाख ६२ हजारांचा १५.५८८ किलोग्रॅम वजनाचा गांजासह १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कळव्यातील रेतीबंदर रोड भागात दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अंमलदार सागर सुरळकर यांना मिळाली होती. त्याच आधारे २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक योगेश काकड, विकास सुर्यवंशी, हवालदार राजेंद्र सांबरे, प्रशांत निकुंभ, राजेंद्र संदानशिव, दीपक जाधव, उमेश जाधव, तौसिफ पठाण, पोलिस नाईक गणेश बडगुजर, समीर लाटे आणि सुरळकर आदींच्या पथकाने रेतीबंदर रोड भागात सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईमध्ये सोमेश जयस्वाल आणि दीपेश जयस्वाल (२२, रा. मध्यप्रदेश ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ किलो ५८८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संदीप पावरा (२१, रा. शेमल्या, धुळे) आणि दीपक जयस्वाल (२०, रा. सेंधवा, मध्यप्रदेश) यांनाही नाशिक महामार्ग पोलिसांच्या मदतीने पिंपळगाच (नाशिक) येथून ताब्यात घेतले. या आरोपींनी अंमली पदार्थांच्या वाहतूकीसाठी उपयोगात आणलेली मोटारकार, दोन लाख ६२ हजारांचा गांजा आणि मोबाईल असा १७ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे. चौघांनाही २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.