- जितेंद्र कालेकरठाणे - कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला दहा कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून २०१७ मध्ये दहा कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी तांबट याच्यासह रवी पुजारी तसेच अन्य दोष्घांविरुद्ध खंडणीसह महाराष्ट्र संष्घटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा मोक्का न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. गँगस्टर रवी पुजारी याने रोमा बिल्डर्सचे महेंद्र पमनानी यांच्याकडे २०१७ मध्ये फोनद्वारे दहा कोटींच्या खंडणीची मागणी करीत ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच टोळीतील शार्प शूटर यांना रोमा बिल्डर्सच्या ठाण्यातील कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी पाठविले होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दिनेश रॉय आणि नितीन रॉय या दोघांना अटक केली होती. पुढे त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. यातील विजय तांबट हा मात्र फरार झाला होता. तो परदेशात पळाल्यामुळे त्याच्यावर लूकआऊटची नोटीसही जारी केली होती.
तांबट हा १९ ऑक्टाेबर २०२३ रोजी विमानाने युनायटेड अरब अमिराती देशातून भारतात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आल्याची माहिती एलओसीच्या आधारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. सहायक पाेलिस आयुक्त राजकुमार डाेंगरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.