मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. भारताला खिजविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयएसने त्या दोघांचे फोटोशूट करून सोशल मीडियावर व्हायरलही केले होते. अगदी तसाच प्रकार ठाण्यात घडला आहे.
ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जावून लग्न केले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. यानंतर तीने गुपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजूसारखीच भारतात परतली आहे.
फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली व ती १७ जुलैला भारतात परतली आहे. ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरु केली आहे. सनम खान असे या तरुणीने नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सीमा हैदर ही महिला गेल्या वर्षी भारतात आली होती. ती देखील फेसबुकवरील गेमवर ओळख झाल्याने पती आणि मुलांना सोडून भारतात आली होती. यानंतर अंजूचे प्रकरण बाहेर आले होते. आता ठाण्यातील सनम या तरुणीने पाकिस्तानात जात तेथील व्यक्तीशी लग्न केले आहे. पाकिस्तान हा भारताविरोधात कटकारस्थान करणारा देश आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहेत. २०२२ मध्ये नाशिकमधील तरुणीनेही दुबई, लिबियामार्गे पाकिस्तान गाठत लग्न केले होते. तिच्या पालकांनी ती हरविल्याची तक्रार दिली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती भारतात परतल्यानंतर खरे बिंग उघड झाले होते.