ठाणे: महिनाभरापूर्वी उत्तरप्रदेशातून चुकून ठाण्यात आलेल्या १७ आणि चार वर्षीय दोन बहिणींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने सोमवारी पालकांच्या स्वाधीन केले. ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनीही या मुलींचे पालक मिळावे, यासाठी पोलिसांना खास सूचना केल्या होत्या. कामगिरी यशस्वी केल्यानंतर न्या. तांबे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही तपास पथकाचे विशेष कौतुक केले.ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला १५ जानेवारी २०१९ रोजी १७ वर्षीय मुलगी तिच्या चार वर्षीय बहिणीसोबत कोपरी पोलिसांना मिळाली होती. दोघींपैकी मोठी मुलगी मानसिक रुग्ण असल्याचे आढळले. त्यामुळे मोठीला ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर धाकटया मुलीला कोपरी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. दोघींनाही कोपरी पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले. तेंव्हा मुख्य न्यायदंडाधिकारी तांबे यांनी ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनाही या प्रकरणाची माहिती देऊन तपास करण्याचे सूचित केले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या दोन्ही मुलींचे छायाचित्र पाठवून तपासाला गती दिली. दरम्यान, यातील १७ वर्षीय मुलीकडे मनोरुग्णालयाच्या डॉक्टरांनी चौकशी केल्यानंतर तिने दिलदारनगर, बिहार इतकीच तिची त्रोटक माहिती दिली. बिहारमध्ये कुठेही दिलदार नगर नसल्याची माहिती पोलिसांना इंटरनेट तसेच इतर माध्यमांतून माहिती मिळाली. त्यानंतर हा परिसर उत्तरप्रदेशात असल्याची माहिती समोर आल्यानंतर दौंडकर यांच्या पथकाने दाजीपूर जिल्हयातील पोलिसांशी संपर्क साधला. दाजीपूरमध्ये दिलदारनगर असून तेथील पोलीस ठाण्यात या दोन बहिणी बेपत्ता असल्याचीही नोंद पोलिसांना मिळाली. त्यानंतर दाजीपूरचे पोलीस निरीक्षक मिश्रा यांना या दोघींची छायाचित्रे व्हॉटसअॅपच्या मदतीने दाखविण्यात आली. त्यांनी या आपल्याच मुली असल्याचे ओळखल्यानंतर या पालकांना ठाण्यात बोलावून मुलींना न्या. तांबे यांच्या मध्यस्थीने त्यांच्या ताब्यात देण्यात आले.न्यायालयाने दाखविले माणूसकीचे दर्शनया दोन मुली उत्तरपद्रेशातून भरकटल्याची माहिती न्या. तांबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या दोघींनाही नविन कपडे विकत घेऊन दिले. शिवाय, कोपरी, ठाणेनगर आणि एचटीसीचे रवींद्र दौंडकर यांच्याशी सतत संपर्क साधून या मुलीच्या पालकांना शोधण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. न्यायालयानेच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष दिल्याने आमचेही मनोबल उंचावले होते. या प्रकरणानंतर पोलीस आणि न्यायालय यांच्यावरील विश्वास आणखी दृढ होईल , असे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज म्हणाले.कसे गाठले ठाणे...या मुलीच्या उत्तरप्रदेशातील दिलदारनगर येथे त्यांची आत्या त्यांना भेटण्यासाठी ८ जानेवारी रोजी आली होती. ती दोन दिवसांनी निघाल्यानंतर मोठी मुलगी त्यांच्या मागे लागली. तिच्या पाठोपाठ धाकटीही तिच्या मागे आली. रेल्वे स्थानकामध्ये पॅसेंजरऐवजी या दोघीही भलत्याच गाडीत बसल्या. त्यामुळे १२ जानेवारी निघालेल्या या मुली १५ जानेवारी रोजी ठाण्यात पोहचल्या. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे दौंडकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक ए. व्ही. पगार, जमादार तानाजी वाघमोडे, हवालदार राजकुमार तरडे, निशा कारंडे, अंक्षिता मिसाळ, अक्षदा साळवी आणि बेबी मसाळ या पथकाने मोठया भोजपूरी भाषेची दुभाजक मिळवून तसेच इजर कौशल्य पणाला लावून या मुलींशी संवाद साधत अनेक बाबींचा उलगडा करीत त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले.--------तपास पथकाला १० हजारांचे बक्षीस...ठाण्याच्या प्रादेशिक रुग्णालयातच या दोन्ही मुलींना उत्तर प्रदेशातून आलेल्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाही. बिहारच्या संग्रामपूरमध्ये मोठ्या मुलीचे सासर होते. मात्र, तिने बिहार, दिलदारनगर अशी चुकीची माहिती देऊनही कौशल्याने तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दौंडकर यांच्या पथकाला १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. न्या. तांबे यांनीही या पथकाचे विशेष कौतुक केले.
उत्तरप्रदेशातून भरकटलेल्या दोन बहिणींना ठाणे पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:02 PM
उत्तरप्रदेशातून एका रेल्वे स्थानकात पॅसेंजर ऐवजी भलत्याच रेल्वेमध्ये बसल्यामुळे ठाण्यात आलेल्या १७ आणि चार वर्षीय दोन बहिणींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने सोमवारी पालकांच्या स्वाधीन केले. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातच या दोन्ही मुलींना उत्तर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाही.
ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांनी दिले दहा हजारांचे बक्षिसठाणे न्यायालयानेही दिली कौतुकाची थाप मुलींच्या पालकांना आनंदाश्रू अनावर