ठाणे : मालकाच्याच अडीच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अब्दुल खालिद मोहम्मद कैसार शेख (४२) या नोकराला ठाणे न्यायालयाच्या (विशेष पोस्को) न्यायाधीश के.डी शिरभाते यांनी शनिवारी दोषी ठरवले. तसेच त्यांनी आरोपीला दहा वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. ही घटना २०१४ मध्ये मुंब्य्रात घडली होती.
आरोपी हा पीडित मुलीच्या वडीलांच्या कारखान्यात कामाला होता. तसेच तो त्यांच्यासोबत राहत होता. ५ ऑक्टोबर २०१४ रोजी पीडित मुलीचे आई - वडील हे बकरी ईद असल्याने कपडे खरेदीसाठी मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी, पीडित आणि तिच्या बहिणीसोबत आरोपी अब्दुल शेख हा घरीच थांबला होता. याचदरम्यान आरोपीने अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तेथून पळ काढला होता.
याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली. तसेच तपास करून याप्रकरणी दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल केले होते. हा खटला विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे आणि आठ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी अब्दूल शेख याला दोषी ठरवत, दहा वर्षे कारावास आणि दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणाचा तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बागवान यांनी केला होता.