ठाणे : विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कामेश हा ठाण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहे. त्याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले आहे. विवाहित असल्याची बाब लपवून ठेवून त्याच कंपनीत नोकरी शोधण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीशी त्याने १४ जून २०२० रोजी नोकरी लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. तो तिच्यावर खरे प्रेम करीत असल्याचे तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना त्याने भासविले. तसेच तिच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅपवर मेसेजही केले. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही तिला एकांतात भेटून तिला रक्ताचा टिळक लावून तिला पत्नी म्हणून स्वीकारल्याचे तसेच लवकरच त्याच्या आई-वडिलांना सांगून तिच्याशी लग्न करणार असल्याचाही त्याने बहाणा केला. त्याच बहाण्याने त्याच्या आई-वडिलांना भेटण्याचे निमित्त करून १४ जून २०२० रोजी आणि त्यानंतरही तीन दिवसांनी चिरागनगर येथील त्याच्या घरी बोलावून तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात ती गरोदरही राहिली. यातून आपले बिंग फुटेल म्हणून त्याने तिला समतानगर येथील एका खासगी रुग्णालयात १६ ऑक्टोबर २०२० रोजी तिला दाखल करून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले.
सध्या मूल जन्मास घालणे आपल्यासाठी चांगले नसल्याचे सांगून तिच्यावर दबाव आणून भावाला ठार मारण्याची धमकी देत गर्भ पाडण्यासाठीही दबाव आणला. नंतर गर्भपात करण्यास सहमती मिळवून तिचा विश्वासघात केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताव या प्रकाराबद्दल तरुणीने त्याच्याविरूद्ध ७ जुलै रोजी लैंगिक अत्याचार, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट नाले, पोलीस नाईक प्रशांत बुरके आणि संदीप भांगरे आदींच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कामेश याला कोपरखैरणे येथून १० जुलै २०२१ रोजी अटक केली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन ढोले हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.